सफाई कर्मचाऱ्याकडून महिला डॉक्टर ला अश्लील इशारे

नागपूर : नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका महिला इंटर्न डॉक्टरने पोलिस ठाणे तहसील येथे दिलेल्या तक्रारीनंतर खळबळजनक प्रकार समोर आला आहे. लिफ्टमध्ये सफाई कर्मचाऱ्याने अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, पीडित महिला डॉक्टर ड्युटीवर असताना लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर जात होत्या. त्याच लिफ्टमध्ये सफाई कर्मचारी मनोहर समुद्रे काही साहित्य घेऊन आला. लिफ्टमध्ये फक्त दोघेच असताना आरोपीने अचानक आपले पँट आणि अंतर्वस्त्र काढले आणि स्वतःच्या गुप्तांगाला हात लावत अश्लील हावभाव करत पीडितेकडे पाहू लागला.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिला डॉक्टर लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर उघडताच ओरडत बाहेर पडल्या. त्यांनी त्वरित हा प्रकार त्यांच्या डॉक्टर मित्रांना व सहकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सुरेखा सागर व पोलिस पथकाने तत्काळ मेयो हॉस्पिटल गाठून आरोपी मनोहर समुद्रे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या तो जेलमध्ये आहे.
या प्रकरणामुळे नागपूरच्या आरोग्य व्यवस्थेत मोठा धक्का बसला असून, महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे.