Nashik : नाशिकमध्ये दुचाकी चोरीची परप्रांतीय टोळी सक्रिय; चोरीच्या ९ दुचाकींसह दोघे ताब्यात

नाशिक : मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकी चोरी करणारी परप्रांतीय टोळी सक्रिय झाली असून यातील दोन जणांना पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ९ दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतीत दुचाकी चोरी झाली होती. या चोरीचा तपास करताना गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजीवनगर भागात सापळा रचून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. करण शिंदे व शामसुंदर गेडाम असे अटक केलेल्या संशयिताच नाव आहे. त्यांनी वेगवेगळ्या भागातून चोरलेल्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे हे दोघेही परप्रांतीय असून एक तेलंगणा तर दुसरा परभणीमधील राहणारा आहे. हे दोघे महागड्या दुचाकी चोरी करण्यासाठी नाशिकमध्ये यायचे. दुचाकी चोरी करून काही दिवस पसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. तर त्यांचे आणखी कोणी साथिदार आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.
दोघांवर पाच गुन्हे दाखल
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांकडून दहा लाख रुपये किमतीच्या ५ महागड्या दुचाकी सह एकूण ९ मोटर सायकल हस्तगत केल्या आहेत. या संशयीतांवर नाशिकच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे देखील उघडकीस आले असून अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहे. तसेच त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.