अकोला : बाळापुर पीएचसीमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू
बाळापुर : बाळापुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील (PHC) गंभीर दुर्लक्षामुळे एका डायलिसिस रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना रविवारी उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद शोएब गुलाम शब्बीर (वय ५०, रा. बाळापुर ग्रामीण रुग्णालयासमोर) असे असून, रविवारी दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.
नातेवाइकांनी तात्काळ बाळापुर पीएचसीमध्ये दाखल केले, मात्र त्या वेळी ना डॉक्टर होते, ना कर्मचारी. सर्वात गंभीर बाब म्हणजे, रुग्णासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नव्हता किंवा तो रिकामा होता, अशी माहिती पुढे आली आहे.
30 मिनिटे मदतीविना झुंज – पण निष्फळ
नातेवाइकांचा आरोप आहे की, तब्बल अर्धा तास कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. ज्या क्षणी ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा उपस्थित कर्मचाऱ्यांना त्याचा वापर कसा करायचा, हेच माहित नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खासगी एंबुलन्सने प्रयत्न; पण मृत्यू अटळ
शोएब यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने नातेवाइकांनी खासगी एंबुलन्स बोलावली व त्यांना अकोल्याकडे हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच ऑक्सिजनअभावी त्यांचा मृत्यू झाला.
नातेवाइक व कार्यकर्त्यांचा संताप; तात्काळ कारवाईची मागणी
या घटनेनंतर संतप्त नातेवाइक व सामाजिक कार्यकर्त्यांनी PHC प्रशासनावर गंभीर आरोप केले असून, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
आरोग्य सेवांची खिळखिळी अवस्था स्पष्ट
ही घटना ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा, अपुऱ्या सुविधा व व्यवस्थेतील दुरवस्था याचे जिवंत उदाहरण बनली आहे. बाळापुर तालुक्यात आरोग्यसेवा केवळ नावापुरतीच शिल्लक राहिली आहे, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.