अमरावतीच्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; ठाकूर-बंड यांची सत्ता असलेल्या ‘खरेदी-विक्री’ संघावर कायमस्वरुपी निर्बंध

Amravati News : अमरावती तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. सोयाबीन खरेदीदरम्यान अनियमितता केल्याचा ठपका ठेवत या संस्थेवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता आगामी हंगामातील कोणतीही शासकीय खरेदी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. दी विदर्भ को ऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने सदरची कारवाई केली आहे. या कारवाईचा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अमरावती खरेदी विक्री संघावर सध्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेच्या माजी नेत्या प्रीती बंड यांच्या गटाची सत्ता आहे. यशोमती ठाकूर यांचे 6 सदस्य आहेत, तर प्रीत बंड यांचे 3 सदस्य आहेत. याशिवाय काँग्रेस नेते मनोज देशमुख यांच्या गटाचेही 2 सदस्य आहेत. ठाकूर आणि बंड यांची आघाडी असून काँग्रेसचे हरीश मोरे सभापती आणि बंड गटाचे भय्यालाल निर्मळ उपसभापती आहेत. याशिवाय ठाकूर गटाचेच अभय महल्ले हे अध्यक्ष आहेत.
याच खरेदी विक्री संघातर्फे 2024-25 या वर्षात नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असताना या संस्थेकडून ऑफलाइन प्रक्रिया राबविली गेली. त्यामुळे यामध्ये अनियमितता केल्याचा ठपका होता. याची दखल घेत अशा संस्थांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्याची शिफारस राज्य सरकारच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने दी विदर्भ को ऑप मार्केटिंग फेडरेशनला केली होती.
फेडरेशनकडून जामोद, मलकापूर, पिंपळी गवळीसह अमरावती खरेदी-विक्री संघाला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचा आदेश काढला आहे. परंतु या दरम्यान संस्थेने 1 हजार 289 शेतकऱ्यांची ऑनलाइन तूर खरेदीची नोंदणी केली आहे. यातील 1 हजार 250 शेतकऱ्यांना त्यांनी खरेदीकरिता कॉल दिले आहे. त्यामुळे या संस्थेकडून तूरखरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे.