अमरावतीत इस्कॉनच्या बालकृष्ण धामचे भूमिपूजन! मालू कुटुंबियांचं भव्य भूमिदान |
रेवसा : रेवसा रोडवरील मालू सिटी येथे प्रस्तावित ‘बालकृष्ण धाम’ इस्कॉन मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य आणि ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ, आमदार रवी राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, जगदीश गुप्ता आणि वरूण मालू यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मालू कुटुंबियांचा अलौकिक उपक्रम
स्व. प्रवीण मालू आणि स्व. प्रणम मालू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मालू एंटरप्रायझेसने तब्बल १ लाख चौरस फूट भूखंड इस्कॉन संस्थेला दान दिला आहे. यावर इस्कॉन संस्था ‘बालकृष्ण धाम’ या नावाने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे भव्य मंदिर उभारणार आहे.
राजकीय, धार्मिक आणि भक्तांची मोठी गर्दी
या भूमिपूजन सोहळ्याला देश-विदेशातून आलेल्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. प.पू. श्रील लोकनाथ स्वामी महाराज आणि प.पू. भक्तिपद्म सौरभ प्रचारक स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पार पडले.
मुख्यमंत्र्यांचे कौतुक आणि आश्वासन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मालू कुटुंबियांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. “हे मंदिर महाराष्ट्रात भक्तांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र ठरणार आहे,” असे सांगत त्यांनी संपूर्ण परिवाराचा गौरव केला. या वेळी मालू कुटुंबियांनी त्यांना राधा-कृष्णाचा भव्य फोटो भेट देऊन सन्मान केला.
भविष्यातील धर्मपरंपरेचा पायाभूत टप्पा
हे मंदिर केवळ धार्मिक स्थान न राहता, एक अध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. संत-महंतांच्या उपस्थितीने वातावरण भक्तिभावाने भारले होते.