‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कराविरोधात गरळ ओकणाऱ्या नक्षल समर्थक पत्रकाराला नागपुरातून अटक

नागपूर :’ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सैन्यविरोधात सोशल मीडियावर गरळ ओकणाऱ्या नक्षल समर्थक तरुणाला नागपुरात अटक करण्यात आली आहे. अटक केलेला तरूण स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
रेझाम माडेपट्टी शिबा सिदीकी असं 26 वर्षीय तरुणाचं नाव असून त्याला नागपुरातील (Nagpur) एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. अटक केलेला तरूण मूळचा केरळमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक हा काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या परिषदेत सहभागी झाला होता.
या परिषदेत समाजविरोधी कारवाया करणाऱ्या पत्रकारांच्या सुटकेसाठी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तो नक्षल समर्थक लोकांनाही भेटल्याची माहिती समोर आली आहे. सिदीकी हा डेमोक्रॅटिक स्टुडंट्स असोसिएशनशी संबंधित असून दिल्लीहून परतल्यानंतर तो नागपुरात त्याच्या एका मैत्रिणीला भेटल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
लकडगंज पोलिसांना या संदर्भातील माहिती मिळताच त्यांनी लगेच या तरूणाला एका हॉटेलमधून अटक केली. जातीय भेदभाव, सांप्रदायिक हिंसाचार, राज्य दडपशाही, यासारख्या विषयाला तो ‘मकतूब मीडिया द ऑब्जरवर पोस्ट’ यासारख्या आउटलेटसाठी लिखाण करायचा.
ऑपरेशन सिंधूरनंतर त्याने दोन बंदुकीसह फोटो काढत ते सोशल माध्यमांवर पोस्ट केले होते. भारतीय सैन्याविरोधात लिखाण करत भारतीय लष्कर पाकिस्तानातील निष्पाप लोक आणि मुलांना मारत आहे, अशा आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती.