जम्मू-काश्मीर सीमेवर ब्लॅक अलर्ट, अकोट तालुक्यातील ४० भाविक पठाणकोटमध्ये अडकले

अकोट : जम्मू-काश्मीर सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी जारी केलेल्या ब्लॅक अलर्टमुळे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातले सुमारे 40 महिला, पुरुष आणि लहान मुले पठाणकोटमध्ये अडकले आहेत. हे सर्वजण वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. सध्या या सर्व भाविकांचा संपर्क त्यांच्या कुटुंबीयांशी आणि जिल्हा प्रशासनाशी सुरू असून, सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
या गटात भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर, यांच्यासह अकोट तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांचा समावेश आहे. पठाणकोट हे जम्मूच्या सीमेवरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने, ब्लॅक अलर्ट लागू झाल्यानंतर या परिसरात हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे.
भाविकांच्या अडकल्याची माहिती समजताच अकोट तालुका प्रशासनाने तातडीने संपर्क साधला असून, सातत्याने अपडेट घेतले जात आहेत. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित आपत्ती व्यवस्थापन विभागही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, भाविकांच्या नातेवाइकांमध्ये काळजीचं वातावरण असून लवकरात लवकर सुरक्षित परतीची मागणी केली जात आहे. प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्याची माहिती समोर आली आहे.