दुचाकी कटच्या वादात चाकूने सपासप वर करून हत्या, अमरावतीतील घटना

अमरावती : अमरावतीतील रुख्मिणी नगर परिसरात पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा किरकोळ कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन, एका 18 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना 8 मेच्या रात्री 11:30 वाजता घडली.
मृतकाचे नाव सूरज उर्फ बंटी रवींद्र मनोहरे (वय 18) असून, तो विलासनगरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारा होता. सूरज हा आपल्या मित्रांसह सायन्स्कोर मैदानावरील मेळा पाहून परत येत असताना दुचाकीवरील एका गटाचा कट लागल्याने तिथे वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत आणि शेवटी चाकू हल्ल्यात झाले.
आरडाओरड होताच आरोपींनी घटनास्थळी दुचाकीवरून पलायन केलं. मित्रांनी गंभीर अवस्थेतील सूरजला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आधी यशोदा नगर परिसरात पाहणी केली, मात्र माहितीच्या आधारे रुख्मिणी नगरजवळील पेट्रोल पंप परिसरातच घटना घडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डिटेक्शन ब्रँच (डीबी) पोलिसांनी तपास गतीने पुढे नेत महादेव खोरी परिसरातून पहाटेच्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले.
- आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- यश इंगळे (वय 18, रा. यशोदा नगर)
- आदित्य बागडे (वय 19)
- एक विधी संघर्षित बालक
या हत्येच्या गुन्ह्यात आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिस तपासात उघड झाल्यानुसार, चारही आरोपी वलगाव येथे केटरिंगच्या कामासाठी गेले होते. नंतर दुचाकीवरून अमरावतीकडे परतत असताना मृतकाच्या दुचाकीला कट लागल्याने वाद उद्भवला आणि त्याच वेळी चाकूने हल्ला झाला.
मृतक सूरजचा भाऊ मनीष मनोहरे यांच्या तक्रारीवरून आरोपींवर कलम 302, 34 आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.