नागपूरमध्ये कोंबुन ठेवलेल्या 7 गायींची सुटका, आरोपी अटकेत | 1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : पोलिसांच्या सतर्कतेमुळे नागपूरात एका मोठ्या जनावर तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. पहाटेच्या पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात गायींची सुटका केली असून, आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार राजेश कोकाटे यांना पेट्रोलिंग दरम्यान पहाटेच्या सुमारास एक गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून शहानिशा केली असता, सात गायी अस्ताव्यस्त स्थितीत एका ठिकाणी बांधलेल्या आढळून आल्या. यामध्ये चार पांढऱ्या आणि तीन लाल गायी होत्या.
पोलिसांनी तातडीने त्या जनावरांची माहिती पडताळली असता, त्या जनावरांचा मालक शेख मोहसीन कुरेशी असून तो आझादनगर, नवीन टेक वस्तीत राहणारा आहे. पोलिसांनी सातही गायींची सुटका करून, त्यांना धंतोली आणि कळमेश्वर येथील गोशाळेत सुरक्षितरीत्या हलवले.
या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ₹1,60,200 इतकी आहे. यामध्ये गायींची किंमत आणि त्यांना बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोरीची किंमत (₹200) समाविष्ट आहे. गायींना अत्यंत कोंबून ठेवलेले होते, जेणेकरून त्यांना त्रास होत होता.
या संपूर्ण कारवाईत PSI जाधव, हवालदार राजेश कोकाटे, शंकर आडे, मनोज चौधरी आणि ओमप्रकाश बोर्डे या अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. आरोपी शेख मोहसीन कुरेशीविरोधात योग्य गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
पोलिस अधिक तपास करत असून, जनावरांची तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.