LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला. यावेळी जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी सान, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मेट्रोच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी  या 13 कि.मी. मार्गाचे लोकार्पण 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. आता फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत 22 कि.मी. मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून मेट्रो तीनचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो 3 मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे.

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रोचा मार्ग मिठी नदीच्या खालून जात आहे. त्याचप्रमाणे गिरगाव सारख्या गर्दीच्या ठिकाणीही मेट्रोचे काम सुरळीत झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील दोन स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. याद्वारे मुंबईकर तसेच महामुंबईतील नागरिकांसाठी सुलभ व अखंड परिवहन जोडणी (सिमलेस ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी 50 कि.मी. तर पुढील वर्षी आणखी 50 कि.मी. मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सिंगल प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार

मेट्रो, बेस्ट, लोकल या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यातून प्रवाशांना एकाच तिकीटावर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत हा प्रयोग सुरू करण्यात येणार असून त्यानंतर महामुंबईतही ही सेवा देण्यात येणार आहे. सध्या यावर प्रायोगिक तत्वावर काम सुरू असून लवकरच त्याचा व्यावसायिक वापर सुरू होईल. यामुळे नागरिकांना मुंबई तसेच महामुंबई परिसरात सुलभपणे प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बेस्टने कालच गुगल सेवेबरोबर सांमजस्य करार केला आहे. यापुढे बेस्टच्या बसेसचे रिअल टाईम लोकेशन गुगलवर मिळणार असून या ठिकाणी प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजनही करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!