विद्युत झटक्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, नागपूरची घटना

नागपूर : नागपूरमध्ये एका हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. हृदयतुल्ला हमीद हुसेन शेख (वय 14 वर्षे) हा बालक बकऱ्यांसाठी चारा तोडण्यासाठी झाडावर चढला होता, पण त्याला जीव गमवावा लागला.
हृदयतुल्ला पिंपळाच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना, झाडालगतून गेलेल्या हाय व्होल्टेज MSEB (महावितरण) च्या विद्युत तारांमध्ये त्याचा संपर्क आला. यामुळे त्याला तीव्र विद्युत धक्का बसला आणि तो झाडावरच अडकला. ही धक्कादायक घटना पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महावितरण व फायर ब्रिगेडच्या पथकांना पाचारण केले. विद्युत पुरवठा बंद करून त्या मुलाला झाडावरून खाली उतरवण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्या चिमुकल्याला मृत घोषित केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तेलरांधे यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, हाय व्होल्टेज तारांच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.