6 वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला! गळ्यावर खोल जखम, नागपूरच्या प्रशासन प्रश्नचिन्ह

नागपूर : नागपूर शहराच्या दत्तावाडी परिसरातील एपी फिटनेस जिमजवळील सुरक्षा नगरमध्ये आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. स्वरूप विजय मेश्राम (वय 6 वर्षे) या चिमुकल्यावर तीन भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला करत त्याला फरफटत नेलं. या हल्ल्यात स्वरूपच्या गळ्यावर खोल जखम झाल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्वरूप घरासमोर खेळत असताना तीन भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी त्याला अक्षरशः ओढत नेऊन गळ्यावर तीव्र चावे घेतले. स्वरूप एवढा हादरला की तो किंचाळूही शकला नाही.
स्थानिक रहिवासी अखिल पोहनकर आणि त्यांच्या आईने दाखवलेली माणुसकी या ठिकाणी देवदूत ठरली. त्यांनी लगेच स्वरूपला उचलून कारने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करत रेबीजची लस दिली, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला शहरातील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, गळ्यावरील जखम मेंदूवर परिणाम करू शकते. या महिन्यात दत्तावाडी परिसरातील ही तिसरी घटना आहे जिथे भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका केली असून, ना कुत्र्यांच्या पकडण्याची कारवाई, ना लसीकरण – नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अखिल पोहनकर यांनी प्रशासनाला जाहीरपणे सुनावलं असून, तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नियोजनबद्ध लसीकरण करण्याची मागणी केली आहे.