अमरावतीत पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला
अमरावती – शहरातील समाधान नगर परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पतीनेच चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना फैजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, सध्या पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राप्त माहितीनुसार, पूजा राहुल तबोले (वय 30, रा. समाधान नगर, अमरावती) हिला तिच्या नवऱ्याने, राहुल तांबोरे, याने जेवणाच्या बहाण्याने बोडणा फाट्याजवळ नेले. तिथे त्याने अचानक तिच्यावर चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केले.
घटनेनंतर पूजा हिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती अत्यवस्थ असून, डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.
पीडितेने दिलेल्या प्राथमिक जबाबात, “माझ्यावर चाकूने हल्ला करणारा माझाच नवरा आहे,” असे स्पष्ट सांगितले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, फैजरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व तपास पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.