इस्रायलने मानवतावादी मदत अडवल्याने गाझामध्ये भीषण अन्नटंचाई, नागरिकांवर कासवाचं मांस खाण्याची वेळ

इस्रायलने गाझामध्ये येणारी मानवतावादी मदत गेल्या काही दिवसांपासून थांबवली आहे. त्यामुळे गाझामधील नागरिकांना भीषण अन्न टंचाईचा सामना करावा लागतोय. गाझामधील लोकांवर समुद्रातील कासवांचं मांस खाण्याची वेळ आलीये. याठिकाणी एवढी अन्नटंचाई आहे की, लोकांना कासवाचं मांस खाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यापूर्वी काही संस्था या लोकांना मदत करत होत्या. मात्र, त्यांच्याकडील अन्नसाठीही आता संपला आहे. गाझामधील मच्छीमारांनी सध्या समुद्रातील कासव पकडण्यास सुरुवात केली आहे.
‘यापूर्वी कधीही कासवाचं मांस खाल्लेलं नाही आणि आम्ही तसा विचारही केलेला नव्हता’
गाझामधील मच्छमार असलेला नागरिक अब्देल कनन Al Jazeera शी बोलताना म्हणाला, आमच्याकडे कासवाचं मांस खाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. आम्ही यापूर्वी कधीही कासवाचं मांस खाल्लेलं नाही आणि आम्ही तसा विचारही केलेला नव्हता. आम्ही मच्छीमार आहोत, आम्ही केवळ मासेच खायचो. आम्ही आत्तापर्यंत तिसऱ्या वेळेस आम्ही कासवाचं मांस खाल्लेलं आहे. सैन्याने आम्हाला समुद्रात प्रवेश करण्यास बंदी घातली. मच्छीमार मृत्यूला तोंड देत बाहेर पडत आहे. बाहेर पडण्यासाठी आम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. सध्या इथे पोल्ट्री नाही, भाज्या नाहीत. आम्ही ते विकतही घेऊ शकत नाहीयेत.
मजदा कनन म्हणाल्या, ते कासवाला कट करतात, स्वच्छ करुन देतात. त्यानंतर आम्ही ते सर्वांमध्ये वाटून घेतो. प्रत्येकजण खातो आणि वाटून घेतो. कासव विक्रीसाठी नाहीत, ते आम्ही खातोय. ज्यांना खावं असं वाटतं त्यांनाही आम्ही देत आहोत. गाझा पट्टीकडे जाणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. इथल्या मार्केटमध्ये फार काही सामान उरलेलं नाही. काकडी, टोमॅटो आणि मिरची याशिवाय इथे दुसरं काहीही नाही.
इस्रायलने गेल्या आठ आठवड्यांपासून इथे येणारी मानवी मदत थांबवली
सध्या गाझामधील लोक जगण्यासाठी अन्नाच्या शोधात आहेत. अन्न मिळवण्यासाठी धडपड करत असताना अनेक मच्छमार आत्तापर्यंत शहीद झाले आहेत. शिवाय अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. समुद्रकिनारी सैन्याकडून मच्छीमारांवर गोळीबार केला जातोय. अन्नसाठी पूर्णपणे संपुष्टात आल्याचं युएनकडून सांगण्यात आलं आहे. इस्रायलने गेल्या आठ आठवड्यांपासून इथे येणारी मानवी मदत थांबवली आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.