महायुतीवर नाराज, जानकर युपीएच्या वाटेवर? राहुल गांधींची घेतली भेट, काँग्रेससोबत जाण्याचे संकेत

अकोला – एकेकाळी महायुतीसोबत मजबूत नातं असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आता नव्या राजकीय समीकरणांकडे झुकताना दिसत आहेत. अकोल्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी युपीएसोबत जाण्याचा स्पष्ट संकेत दिला असून, महायुतीमधील दुय्यम वागणुकीमुळे ते नाराज असल्याचं समोर आलं आहे.
“माझाही पक्ष आहे, आणि पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला हवी,” असे वक्तव्य करून जानकर यांनी मनातील खदखद मोकळेपणाने व्यक्त केली. महायुतीमध्ये योग्य स्थान न मिळाल्याने आता त्यांनी काँग्रेससोबत वाटाघाटी सुरू करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
विशेष म्हणजे, जानकर यांनी अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली असून, यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे. त्यांनी स्पष्टपणे काँग्रेससोबत जाणार असल्याचे जाहीर केले नसले, तरी “योग्य वाटाघाटी झाल्यास आम्ही युपीएसोबत जाऊ शकतो” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय समाज पक्ष लवकरच लाँग मार्च काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा लाँग मार्च नियोजित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.