यवतमाळ: तडीपार असूनही परिसरात फिरणाऱ्या दोघांना अटक; दोन देशी कट्टे व जिवंत काडतूस जप्त

यवतमाळ : लोहारा परिसरातून तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार दीपक ऊर्फ भैया यादव आणि प्रफुल्ल ऊर्फ पप्या रावेकर हे पोलिसांना चकमा देत पुन्हा त्याच भागात वावरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना अटक केली आहे. अटकेवेळी त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे कट्टे आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत
या दोन्ही आरोपींवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळेच त्यांना लोहारा परिसरातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, आदेशाची पूर्णतः पायमल्ली करत हे आरोपी लोहारामध्येच लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात आर्म्स अॅक्टसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.