लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली अडीच हजारांची फसवणूक; मुंबईत सायबर टोळीचा पर्दाफाश

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये गेम चेंजर ठरेलल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली मुंबईमध्ये अडीच हजार जणांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामध्ये जुहू पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली खाती उघडून ती खाती सायबर गुन्हेगारांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या घोटाळेबाजांनी मुंबईमधील वेगवेगळ्या भागातील अडीच हजार जणांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे गुजरातमधून 2500 मुंबईकरांना हा गंडा घालण्यात आला आहे.
खातं सुरु केल्यावर हजार रुपये द्यायचे अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा गुजरातमधील सूरतमधील असून त्याने मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना लक्ष्य केलं. मुंबईतील नेहरु नगर, डी.एन. नगर, धारावीमधील नागरिकांना या टोळीने गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दर महिन्याला तुम्हाला ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दीड हजार रुपये मिळतील असं सांगून या टोळीने अनेकांच्या नावाने बँक खाती सुरु केल्याचं वृत्त ‘मिड डे’ने दिलं आहे. त्यांनी बँक खाती सुरु करणाऱ्यांना सुरुवातीला एक हजार रुपये दिले. तसेच उरलेले 500 रुपये पुढील काही महिन्यांमध्ये तुम्हाला मिळतील असं सांगितलं. मात्र आरोपींनी नंतर ही खाती सायबर गुन्हेगारांना आणि मनी लॉन्ड्रींग करणाऱ्या आरोपींना विकली
पुरुषांच्या नावानेही खाती
जुहू पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये काही बँकांनी व्हेरिफिकेशन आणि इतर पात्रता तपासून पाहिली नाही. खास करुन चाळीत राहणाऱ्या खात्यांचं व्हेरिफिकेशन झालं नाही. पोलिसांनी आतापर्यंत 100 हून अधिक खाती बंद केली आहेत. विशेष म्हणजे नावाप्रमाणे ‘लाडकी बहीण’ योजना ही महिलांसाठी असतानाही अनेक पुरुषांच्या नावानेही खाती सुरु करण्यात आली होती. तुम्हालाही या योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये मिळतील असं फसवणूक करणाऱ्या टोळीनं सांगितलं होतं.
कसं समोर आला हे प्रकरण?
नेहरुनगरमध्ये राहणारा 22 वर्षीय मजूरी करणारा वलिक सय्यद खान याने या प्रकरणामध्ये विले-पार्ले पश्चिम येथे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. वलिकच्या पत्नीला 13 फेब्रुवारी रोजी परिसरातील काही जणांनी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये मिळतात असं सांगितलं. सीमकार्ड वापरुन बँक खातं सुरु करा आणि तुमच्या आधार कार्ड तसेच पॅन कार्डची फोटो कॉपी द्या असं वलिक आणि त्याच्या पत्नीला सांगण्यात आलं. वलिकने पत्नीबरोबर बॅकेत जाऊ तिचं खातं उघडून घेतलं. त्यानंतर या टोळीच्या माध्यमातून खातं उघडलं त्या टोळीतील आरोपीने वलिकला एक हजार रुपये दिले.
15 फेब्रुवारी रोजी वलिकने पुन्हा एकदा या व्यक्तीला फोन करुन इतर काही जणांची खाती उघडायची असल्याचं सांगितल्यानंतर या टोळीतील सदस्य नेहरु नगरमध्ये आला. मात्र त्यावेळी स्थानिकांना या व्यक्तीवर संशय आल्याने स्थानिकांनी जुहू पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित चव्हाण यांनी तातडीने या ठिकाणी दाखल होतं संशियताला ताब्यात घेतलं. त्यावेळी आरोपीची ओळख पटली. अविनाश कांबळे नावाचा हा 25 वर्षीय तरुण वसईचा रहिवाशी असून त्याने फाल्गून जोशी, रितेश जोशी, प्रतिक, श्रृती रवी राऊत यांच्या आदेशानुसार खाती उघडून दिल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याने प्रत्येक खात्यामागे आपल्याला 4 हजार रुपये दिले जायचे अशीही कबुली दिली.
तपासामध्ये धक्कादायक खुलासा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी जुहू पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची एक टीम तयार केली. या टीमच्या तपासामध्ये कांबळे हा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या अशिक्षित लोकांना लक्ष्य करायचा असं दिसून आलं. खातं उघडल्यानंतर ही टोळी खात्याशी संलग्न सीमकार्ड, कागदपत्रं ज्यात पासपोर्ट, आधार कार्ड आणि पॅन कार्डसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत घ्यायचे. त्यानंतर कांबळी ही खाती रितेश जोशी, श्रृती राऊत आणि फाल्गुनी जोशी यांना विकायचा.
कोट्यवाधींचे व्यवहार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही बँकांशी संपर्क साधून खाती गोठवली आहेत. आम्ही श्रृती राऊतच्या घरावर छापा मारला असून तिच्याकडे अनेक पासबुक, डेबिट कार्ड आणि सीम कार्ड सापडले. फाल्गुनी जोशीलाही अठक करण्यात आली असून तिच्या घरी अनेक पासबुक सापडली. आम्ही गोठवलेल्या 100 हून अधिक खात्यांमध्ये 19 लाख 43 हजार 779 रुपये आहेत. या खात्यांवरुन कोट्यवधींचे व्यवहार झालेत. ही खाती सायबर गुन्हे आणि मनी लॉन्ड्रींबरोबरच काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी वापरली जायची.”