“अमरावती जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन मॉकड्रिल; युद्धजन्य परिस्थितीत यंत्रणा सज्ज”
अमरावती : सध्याच्या युद्धजन्य व तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील मॉकड्रिलचे आयोजन करण्यात येत आहे. आज अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात अशाच प्रकारचा आपत्कालीन मॉकड्रिल पार पडला.
या मॉकड्रिल अंतर्गत अशी कल्पना मांडण्यात आली की, राजकमल चौकात एक मोठा स्फोट होतो आणि यासंदर्भातील कॉल जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेटर रूममध्ये येतो. तत्काळ १०८ क्रमांकाची आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली. त्यानंतर २० ते २५ जखमींना रुग्णालयात आणण्यात आले, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.
रुग्णालय प्रशासनाकडून सर्व यंत्रणा तत्काळ कार्यरत करण्यात आल्या. आपत्कालीन कक्ष, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सहाय्यक कर्मचारी यांचा समन्वय दाखवण्यात आला. जखमी रुग्णांना वेळीच उपचार देण्याची तयारी आणि क्षमतेचा कस या मॉकड्रिलद्वारे तपासण्यात आला.
मॉकड्रिलच्या यशस्वी आयोजनाद्वारे हे स्पष्ट झाले की, विपरीत परिस्थितीत देखील जिल्हा रुग्णालय सज्ज आहे आणि आवश्यक आरोग्य सेवा देण्यास सक्षम आहे. या मॉकड्रिलच्या माध्यमातून नागरिकांनीही अशा प्रसंगी घाबरून न जाता योग्य ती माहिती, सहकार्य व संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.