Ulhasnagar Crime : मांजरीचं नखं लागल्याने कुटुंबाला बेदम मारहाण; दोन जण जखमी, उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

उल्हासनगर : शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला मांजरीचे नखं लागल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना उल्हासनगरच्या इमली पाडा परिसरात घडली आहे.
कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून वाद झाल्याच्या घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र शेजाऱ्यांनी पाळलेल्या मांजरीवरून वाद होऊन मारहाण झाल्याची घटना उल्हासनगर येथे समोर आली आहे. या घटनेत पूजा रोंदिया यांच्या घरी मांजरी आहेत. तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अमित रोंदिया यांच्या घरातील एका लहान मुलाला मांजरीचं नखं लागले. यातून दोन्ही परिवारांमध्ये वाद निर्माण झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीपर्यंत पोहचले
दरम्यान मांजरीचे नखं लागल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाले आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. यात अमित रोंदिया, विकास रोंदिया आणि नंदा रोंदिया या तिघांनी मिळून शेजारी राहणारे पूजा आणि त्यांचे पती राकेश यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत पूजा रोदिया याना दुखापत झाली आहे. तर राकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसात दिली तक्रार
दरम्यान सदर मारहाणीची घटना घडल्यानंतर दोन्ही जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. याप्रकरणी त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.