चांदुरबाजारच्या गौरव मोलमजुरी करत, ट्युशनशिवाय शिवमने घेतले 94%
चांदूर बाजार : जिद्द, मेहनत आणि परिश्रमाची प्रेरणादायक कहाणी चांदूर बाजार तालुक्यातून समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या इ. १० वी (SSC) परीक्षेच्या निकालात शिवम कुरवाडे या होतकरू विद्यार्थ्याने 94% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, तो कोणत्याही ट्युशनशिवाय, मोलमजुरी आणि राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी सरावाच्या जोडीने हे यश संपादन केले आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून यशाची उंच भरारी
शिवमचे वडील मजुरी करतात आणि त्याची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या अत्यंत बेताची आहे. दिवसभर वेळ मिळेल तेव्हा मोलमजुरी करून, संध्याकाळी गो सी टोम्पे महाविद्यालय येथे कबड्डी सराव करणे आणि रात्री अभ्यासाला वेळ देणे — अशा कठीण दिनक्रमातही त्याने हार मानली नाही.
ट्युशनविना अभ्यास, पण ठाम निर्धार
शिवमने कोणत्याही शिकवणी वर्गाशिवाय आपल्या मेहनतीच्या जोरावर निर्मिती पब्लिक स्कूल मधून शिक्षण घेतले. त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे त्याला गो सी टोम्पे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्करराव टोम्पे आणि वैष्णवी टोम्पे यांच्याकडून शैक्षणिक मदत मिळाली. हीच मदत त्याच्या यशामागील एक मोठी भूमिका बजावणारी ठरली.
कबड्डीमध्ये राज्यस्तरावरील सहभाग
शैक्षणिक यशाबरोबरच शिवम दोन वेळा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करून चांदूर बाजारचे नाव उज्वल केले आहे. अभ्यास आणि क्रीडा यांचं उत्तम संतुलन ठेवत त्याने आपल्या अंगभूत क्षमतेचं दर्शन घडवलं आहे.
गौरव सोहळ्यात प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती
शिवमच्या या यशानंतर त्याचा गो सी टोम्पे महाविद्यालय, निर्मिती पब्लिक स्कूल, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, जीवन आधार सामाजिक संस्था, जगदंब कबड्डी क्लब आणि श्री हनुमान क्रीडा मंडळ चांदूर बाजार यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भास्करराव टोम्पे, विजयराव टोम्पे, प्राचार्य राजेंद्र रामटेके, बठी पिहुलकर, आकाश ढगे, पत्रकार सागर सवळे, राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक सुयोग गोरले, सनी चिखले, ऋषी पोहकार उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापक गवाळे सर यांच्या हस्ते 2001 रुपयांचे रोख बक्षीस देऊन शिवम कुरवाडे आणि पार्थ भडके यांचा सन्मान करण्यात आला.
शिवमसारखे विद्यार्थी हे समाजासाठी दीपस्तंभ
शिवम कुरवाडेसारख्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द आणि चिकाटी ही नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारी आहे. परिस्थिती कशीही असो, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास आणि परिश्रम यांना पर्याय नाही, हे शिवमने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.