छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अमरावती : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती यंदा अमरावतीत मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. अमरावती रिंग रोडवरील नवसारीजवळ छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण कायम राहावे या हेतूने एक भव्य उद्यान आणि चौक उभारण्यात आला असून या ठिकाणाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी चौक’ असे करण्यात आले आहे.
खोडके दांपत्यांच्या प्रयत्नांना यश
या लोकार्पण सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके आणि विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांच्या अथक प्रयत्नातून तयार झालेला हा ऐतिहासिक चौक आणि उद्यान.
या चौकाचे ‘छत्रपती संभाजी चौक’ असे नामकरण करण्याची मागणी माजी उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांच्या टीमकडून खोडके दांपत्यांना करण्यात आली होती. या निवेदनाची खास वचनपूर्ती करत यश खोडके यांनी या चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.
ढोल-ताशांच्या गजरात भव्य लोकार्पण सोहळा
चौकाच्या लोकार्पणप्रसंगी ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताकांची सजावट, आणि देशभक्तीच्या घोषणांनी परिसर भारलेला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेला अभिवादन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमोल मिटकरी यांचा सत्कार व व्याख्यान
याच कार्यक्रमात विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांच्या भाषणाला उत्तुंग प्रतिसाद मिळाला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.
स्मरणस्थळ नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान
‘छत्रपती संभाजी चौक’ हे स्मरणस्थळ भविष्यातील पिढीसाठी एक प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास खोडके दांपत्यांनी व्यक्त केला. संघर्ष, निष्ठा आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या संभाजी महाराजांचे नाव या चौकाला मिळणे हे अमरावतीकरांसाठी गौरवाचे क्षण ठरले.