महिला सैन्य अधिकाऱ्याचा अवमान करणाऱ्या विजय शाहविरोधात अकोल्यात ‘चप्पल मारो आंदोलन’, जनतेचा तीव्र संताप

अकोला : मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी भारतीय सैन्य दलातील शूर महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर वक्तव्याचा निषेध करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांना “गटार भाषा” वापरल्याची टीका करत तत्काळ FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील बसस्टँड परिसरात आज जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने ‘चप्पल मारो आंदोलन’ करण्यात आले. आंदोलनाचं नेतृत्व आसिफ अहमद खान यांनी केलं.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विजय शाह यांच्या फोटोंवर प्रतीकात्मक चप्पल मारत जोरदार निषेध व्यक्त केला. यावेळी “महिला अधिकाऱ्याचा अवमान म्हणजे सैन्य दलाचा अवमान” असा घणाघात आंदोलकांनी केला.
पंतप्रधानांकडे मागणी : विजय शाह यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा
आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विजय शाह यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “पुन्हा अशा प्रकारचा अपमान झाला, तर जनता गप्प बसणार नाही. प्रतिक्रिया तीव्रच असेल.”