धामणगाव रेल्वे तालुक्यात वीज पडून आजीचा मृत्यू; नातवंडे गंभीर जखमी
धामणगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड शेतशिवारात शुक्रवारी (16 मे 2025) दुपारी सुमारास विजेच्या तडाख्याने एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला. शांत परिसरात अचानक वीज कोसळून एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
सदाशिव वंडले यांच्या शेतात कांद्याचा सरवा वेचण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर अचानक ही दुर्घटना घडली. मृत महिला मुन्नाबाई रामदास कवडे (वय 66), त्यांची मुलगी मंजुळा रमेश कुमरे (वय 45), नातवंड अर्णव (वय 5), सक्षम (वय 8) आणि जिक्रा अब्दुल रहीम (वय 10) हे सर्वजण शेतात काम करत होते.
दुर्दैवाने आकाशातून आलेली वीज थेट या कुटुंबावर कोसळली. मुन्नाबाई कवडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर बाकीचे चार जण गंभीररीत्या भाजले गेले.
गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत.
मंगरुळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. महसूल विभागाने सविस्तर माहिती गोळा केली असून तहसीलदार अभय घोरपडे यांनी सांगितले की, “या घटनेची चौकशी सुरू असून पीडित कुटुंबाला तातडीने मदत पुरवली जाईल.”
या दुर्घटनेने वसाड गावात शोककळा पसरली आहे. एका क्षणात कुटुंबावर ओढवलेले संकट आणि निसर्गाच्या कोपामुळे झालेले नुकसान, ही धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी मोठी धोक्याची घंटा ठरत आहे.