पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू

लग्नसोहळा सुरू असतानाच वऱ्हाडी मंडळींमध्ये किरकोळ वाद होऊन झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे घडली आहे. पंख्याच्या हवेवरून सुरू झालेलं भांडण एवढं वाढलं की, त्यात दगड गोटे, लाठ्या-काठ्या चालू लागल्या. या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लग्नघरावर शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जौनपूर जिल्ह्यातील महाराजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बरहूपूर गावात घडली. येथील राजकुमार यांची मुलगी खुशबू हिचा विवाह प्रतापगड येथील भोजे मऊ येथील रहिवासी असलेल्या सुनील कुमार याच्यासोबत ठरला होता. शुक्रवारी लग्नाचे विधी सुरू असताना वधू आणि वर पक्षाचे लोक स्टेजवर एकत्र जमले होते.
याचदरम्यान, उकाड्यामुळे गावातील कमल नावाचा तरुण त्याच्या तीन सहकाऱ्यांसह स्टेजजवळ बसला होता. तो पंख्याची हवा आपल्या बाजूने वळवत होता. यावरून वधू आणि वर पक्षामध्ये बाचाबाची झाली. सुरुवातीला किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या या वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं. पाहता पाहता लाठ्या-काठ्या, दगड धोंडे चालू लागले. या हाणामारीत कमल कुमार आणि इतर तिघे जण गंभीर जखमी झाले.
घटनास्थळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा लोकांनी कसंबसं हे भांडण थांबवलं आणि पोलिसांना माहिती दिली. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान कमल कुमार याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली. तसेच लग्नघरातही आनंदाच्या वातावरणावर दु:खाचं सावट पसरलं.