पुसदमध्ये मदरसा चालकाकडून देणगीदारांची फसवणूक; ATSच्या चौकशीत उघड

अकोला एटीएसच्या तपासातून उघड झालेला प्रकार; पुसद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
पुसद : पुसद येथील माहूर रोडवरील जामिया अशरफिया अँड वेल्फेअर सोसायटी या मदरशाच्या नावावर देणगी गोळा करताना, प्रत्यक्षात मात्र QR कोडद्वारे स्वतःच्या खात्यात पैसे घेणाऱ्या मदरसा चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) चौकशीत ही फसवणूक उघडकीस आली.
मोबीन शेख मेहबूब (वय ३७, रा. गढी वॉर्ड, पुसद) असे या संशयिताचे नाव आहे. पुसद येथील माहूर रोडवर असलेल्या जामिया अशरफिया अँड वेल्फेअर सोसायटी या संस्थेमध्ये १० ते १८ वयोगटातील मुले शिक्षण घेत असतात. देणगीसाठी वापरले जात असलेल्या पॅम्प्लेट व कॅलेंडरमध्ये संस्थेचे नाव, बँक डिटेल्स आणि QR कोड छापण्यात आला होता.
मात्र ATSच्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता, मोबीन मेहबूब याने संस्थेच्या नावाखाली स्वतःच्या बँक खात्याचा QR कोड वापरल्याचे समोर आले. त्यामुळे देणगीदारांनी मदरशाच्या सामाजिक कार्यासाठी दिलेली रक्कम त्याच्या वैयक्तिक खात्यात जमा झाली.
फसवणूक झालेल्या देणगीदारांची नावे:
मोहम्मद इब्राहिम अन्वर मोहम्मद आजम (वय ३९, रा. फिरदोस कॉलनी, अकोला)
निसारखान इस्माईलखान (वय ४०, रा. बिबी साहेबपुरा, कारंजा लाड, जि. वाशिम)
या दोघांनी संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी QR कोडवरून पैसे ट्रान्सफर केले होते. मात्र ते मोबीनच्या खात्यात गेल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल:
ATSच्या उपनिरीक्षक तुषार नेवारे यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी मोबीन शेख मेहबूब याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.