‘फक्त’ दोन हजारांची लाच घेताना तीन RTO अधिकारी जाळ्यात, यवतमाळच्या ड्रायव्हिंग स्कूलने केला ‘कार्यक्रम’

यवतमाळ : आरटीओ खात्यातील अधिकारी लाखोंची लाच घेताना अटक अशा अनेक बातम्या आतापर्यंत ऐकण्यात येत आल्या असतील. पण यवतमाळमध्ये लाचेचा एक वेगळाच किस्सा घडला. फक्त दोन हजारांची लाच घेताना आरटीओ खात्याचे तीन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. शिकाऊ आणि कायम स्वरुपाचे लायसन्स देण्याच्या बदल्यात एजंटच्या माध्यमातून दोन हजारांची लाच या अधिकाऱ्यांनी घेतली. सुरज गोपाल बाहीते, मयुर सुधाकर मेहकरे, बिभिषण शिवाजी जाधव असे लाचखोर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची नावे आहेत.
Yavatmal RTO Officer Arrested : नेमकं काय घडलं?
शिकाऊ आणि कायम वाहन परवाना देण्याकरिता अधिकृत शासकीय चलनाच्या व्यतिरिक्त 200 रुपये प्रमाणे 10 क्लासेसकडून एकूण दोन हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी आरटीओतील तीन अधिकाऱ्यांसह खासगी एजंटला एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई पुसद येथे आरटीओ कॅम्प परिसरात करण्यात आली. यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे अधिकारी कार्यरत आहेत. बलदेव नारायण राठोड, रा. वाशिम असे लाच स्वीकारणाऱ्या खासगी एजंटचे नाव आहे.
ड्रायव्हिंग स्कूल संचालिकेची तक्रार
लायसन्स कँपदरम्यान आरटीओ अधिकारी लाचेची मागणी करतात अशी तक्रार सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या एका महिला संचालिकेने 7 मे 2025 रोजी तक्रार केली होती. ही लेखी तक्रार यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने कारवाई करत या तीनही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं. याप्रकरणी वसंतनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.