मानहानी व मारहाणीच्या छळातुन युवकाची आत्महत्या
तेल्हारा – मोबाईलच्या उधारीवरून गावात झालेला अपमान आणि जबर मारहाण या मानसिक दबावामुळे सागर शंकर चिकटे या ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथे घडली आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध अपहरण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सचिन रामाजी चिकटे (२८, रा. जस्तगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या चुलत भावाने – सागर शंकर चिकटे (रा. जस्तगाव) – श्रावणी मोबाईल शॉपीवरून मोबाईल उधार घेतला होता. उधारीच्या रकमेसाठी १५ मे रोजी सायंकाळी सागर घरी असताना तेल्हारा येथून उमेश पांडे, अक्षय भारसाकळे, राहुल मोकळकार, विनीत युतकार व यश युतकार हे सर्वजण फोर व्हीलरने आले. त्यांनी सागरकडे पैशांची मागणी केली. सागरने पैसे दुसऱ्या दिवशी देण्याचे विनवत सांगितले, मात्र त्यांनी त्याचे ऐकून न घेता त्याच्यावर जबर मारहाण केली.
गावभर फिरवत अपमान
सागरने गावाबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्याला पकडून गावातच मारहाण करत फिरवले. हा सर्व प्रकार गावकऱ्यांसमोर घडला. सागरच्या चेहऱ्यावर भीतीचे स्पष्ट भाव होते. त्यानंतर त्याला गाडीत टाकून नेण्यात आले आणि तो रात्रीभर कुठेच दिसला नाही.
निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली
१६ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मनोहर चिकटे शेतीसाठी गेले असता, शेतामधील निंबाच्या झाडाला सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी विनय राऊत, विनीत गजानन युतकार, यश गजानन युतकार, उमेश पांडे (रा. तेल्हारा), राम प्रशांत मोकळकार (रा. भोकर) आणि अक्षय भारसाकळे (रा. वाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२), १०८(३)(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील भटकर पुढील तपास करत आहेत.