यवतमाळ ZP केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख पदासाठी सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे आरोप स्थानिक शिक्षकांनी केले होते. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
शिक्षकांच्या वतीने करण्यात आलेल्या या याचिकेत असा दावा करण्यात आला की, जिल्हा परिषदेने पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायदेशीर नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांना अन्याय सहन करावा लागत आहे, अशी भूमिका याचिकाकर्त्यांनी मांडली.
या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रियेवर २५ जून २०२५ पर्यंत तात्पुरती स्थगिती (Stay Order) दिली आहे.
या निर्णयामुळे सद्यस्थितीत पदोन्नती प्रक्रिया पुढे सरकणार नसून, शिक्षण विभागाला न्यायालयीन आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.