Industrial Accident : शारीरिक संबंधादरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोर्टाने कंपनीला दिला झटका, कुटुंबीयांना मिळणार भरपाई

चीनमधून खळबळजनक घटना समोर आलेली आहे. एका ६० वर्षीय सुरक्षा रक्षकाचा कार्यालयात प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू झाला. सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूला चीनमधील कोर्टाने ‘औद्योगिक दुर्घटना’ म्हटलं. कोर्टाच्या निर्णयाने मृत सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबीयांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
झांग नावाचा व्यक्ती बीजिंग येथील एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो सुटी न घेता काम करत होता. कारखान्याच्या सुरक्षा कक्षात आराम करत असताना त्याची प्रेयसी भेटायला आली. त्यावेळी दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. त्याचवेळी झांग याचा मृत्यू झाला. पोलीस तपासात उघड झाले की, यात कोणताही गुन्हेगारी कट रचण्यात आलेला नाही. झांगचा मृत्यू नैसर्गिक होता.
झांगच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर त्याच्या मुलाने बीजिंगच्या सोशल सिक्युरिटी ब्यूरोमध्ये भरपाईसाठी मागणी केली. मात्र, त्याचा अर्ज फेटाळून लावला. मृत्यूवेळी झांग ड्युटीवर नव्हता. त्यावेळी तो वैयक्तिक कामात गुंग होता, असे सोशल सिक्युरिटी ब्यूरोने म्हटलं. यानंतर झांगच्या मुलाने २०१६ साली सोशल सिक्युरिटी कार्यालय आणि कारखान्याविरोधात कोर्टात धाव घेतली. मुलाने दावा केला की, माझ्या वडिलांना सुटी मिळत नव्हती. ते दिवसभर कामावरच असायचे. त्यामुळे वडील २४ तास ड्युटीवर असायचे. त्यांचा ऑन ड्युटीवर मृत्यू झाला आहे’.
कोर्टाने म्हटलं की, “कोणत्याही कर्मचार्याला पाणी पिण्याचा आणि स्वच्छतागृहात जाण्याचा अधिकार आहे. त्याचप्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याचाही अधिकार देखील आहे.” याच आधारावर कोर्टाने झांगच्या मृत्यूला औद्योगिक दुर्घटना घोषित केलं. तसेच औद्योगिक दुखापत विमा अंतर्गत ऑन ड्युटी मृत्यू मानला पाहिजे, असे कोर्टाने म्हटलं.
दरम्यान, सोशल सिक्युरिटी विभाग आणि कारखाना प्रशासनाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र, उच्च न्यायालयाने आधीच्या निर्णयाला कायम ठेवलं. २०१७ साली झांगच्या मृत्यूला औद्योगिक मृत्यू म्हणून सिक्युरिटी विभागाने दुजारो दिला. मात्र, या निर्णयानंतर झांगच्या कुटुंबीयांना किती रुपयांची भरपाई मिळाली, ही बाब स्पष्ट झालेली नाही.