अमरावतीत सांडपाण्याच्या वादातून दोन गटात तुफान मारहाण

अमरावती : अमरावतीच्या भातकुली मार्गावरील वेंकटेश टाऊनशिप परिसरात १७ मे २०२५ रोजी ड्रेनेजच्या सांडपाण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतलं, ज्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. या घटनेत एका गटाने दुसऱ्या गटाच्या घरात घुसून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली, तर दुसऱ्या गटातील एका युवकावर पावड्याने आणि बल्लीने हल्ला करण्यात आला. या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पहिल्या गटातील फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सागर ढोके, गणेश ढोके, विकेश ढोके आणि त्यांच्यासोबतच्या एका महिलेने त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. फिर्यादीच्या मते, सागर ढोके यांनी त्यांच्या नातेवाइकाला फोन करून, “तुमच्या घराचं सांडपाणी साचलं आहे, काढून घ्या,” असं सांगत घराबाहेर बोलावलं. यावेळी फिर्यादी महिला आणि त्यांचा नातेवाईक किसन गंजीवाले घरात असताना, सागर ढोके आणि त्यांच्या साथीदारांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी शिवीगाळ करत लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरू केली. या हल्ल्यात किसन गंजीवाले यांना जबर मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आलं. याशिवाय, फिर्यादी महिला आणि त्यांच्या दोन नातेवाईक महिलांनाही पायावर आणि इतर ठिकाणी दांड्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोरांचा आक्रमकपणा स्पष्ट दिसत आहे. खोलापुरी गेट पोलिसांनी या तक्रारीवरून सागर ढोके, गणेश ढोके, विकेश ढोके आणि संबंधित महिले विरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, दुसऱ्या गटातील फिर्यादी सागर गणेश ढोके यांनी किसन गंजीवाले आणि दोन महिलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
सागर ढोके यांच्या मते, त्यांनी किसन गंजीवाले यांच्याकडून प्लॉट विकत घेतला होता आणि त्याचं बांधकाम सुरू असताना, गंजीवाले यांच्या घरातील सांडपाणी बांधकामाच्या कॉलमच्या खड्ड्यात साचत होतं. सागर यांनी गंजीवाले यांना पाणी काढण्यास सांगितलं, परंतु गंजीवाले यांनी, “ही सरकारी नाली आहे, आम्ही पाणी काढणार नाही,” असं सांगत वाद घातला. या वादादरम्यान, किसन गंजीवाले आणि दोन महिलांनी सागर ढोके यांच्यावर हल्ला केला. सागर यांच्या डोक्यावर
बल्लीने वार करण्यात आला, तर एका महिलेने त्यांच्या कमरेवर पावड्याने हल्ला केला. या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी किसन गंजीवाले आणि दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दोन्ही गटांतील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
खोलापुरी गेट पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारींवर गुन्हे दाखल केले असून, सध्या तपास सुरू आहे. व्हायरल व्हिडीओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. या घटनेने वेंकटेश टाऊनशिप परिसरात तणाव निर्माण झाला असून, स्थानिकांनी पोलिसांना कडक कारवाईची मागणी केली आहे.