यशोधरा नगर पोलिसांची मोठी कारवाई, 1.6 किलो गांजासह आरोपी अटक
नागपूर : नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंधेरी माजरी परिसरात एका मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे. पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, या परिसरात एक व्यक्ती गांजाची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाईचा बेत आखला. पोलिस उपनिरीक्षक (एपीआय) पाटील यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलिस हवालदार बेंद्रे, पोलिस कॉन्स्टेबल वानखडे, सिद्धेश, प्रितम ठाकूर आणि महिला अंमलदार तानावडे यांचा समावेश होता. पथकाने अंधेरी मंदिर परिसरातील म्हाडा क्वार्टर्स येथे छापा टाकला. तिथे क्वार्टर नंबर 10 च्या बाहेर उभा असलेल्या एका संशयित व्यक्तीची विचारपूस केली. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजा सदृश्य वस्तू आढळली.
पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवली. त्याने स्वत:चं नाव आदिल शेख, राहणार अंधेरी माजरी, म्हाडा क्वार्टर नंबर 32, नागपूर असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची सखोल झडती घेतली. या तपासात तब्बल 1 किलो 662 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे 16,600 रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणी NDPS कायद्याच्या कलम 8, 20 आणि 22(g) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आदिल शेख याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, झोन 5 चे डीसीपी निकेतन कदम, एसीपी बंडेवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईमुळे अंधेरी माजरी परिसरातील अवैध ड्रग्ज रॅकेटवर मोठा हादरा बसला आहे. पोलिस आता आरोपीच्या साथीदारांचा आणि गांजा पुरवठा साखळीचा शोध घेत आहेत. या प्रकरणाने नागपूर शहरातील ड्रग्जच्या वाढत्या व्यापारावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं असलं, तरी ड्रग्जविरोधी कारवाई आणखी तीव्र करण्याची मागणीही होत आहे.