पाहणी झाली, आश्वासन मिळालं… पण साईनगरचा रस्ता अजूनही धोकादायकच!

अमरावती : साईनगर व्दारका नगर येथील आकोली रोडवर मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. स्थानिक रहिवासी तेटु यांच्या घरासमोरच्या रस्त्यावर वारंवार अपघात होत असूनही अमरावती महानगरपालिकेच्या संबंधित अभियंत्यांनी अद्याप कार्यवाही केली नाही, ही बाब संतापजनक ठरते.
अभियंत्यांनी पाहणी केली, आश्वासन दिलं – पण कारवाई शून्य!
स्थानिक नागरिकांनी संबंधित अभियंत्यांना खड्ड्यांची माहिती दिल्यानंतर त्यांनी स्वतः पाहणी करून अपघात होण्याची शक्यता मान्य केली. याठिकाणी वाहतुकीचा मोठा भार असल्याचं आणि लहान मुले, मोठ्या वाहनांची सखोल हालचाल असल्याचं निरीक्षण देखील केलं. मात्र केवळ ‘दुरुस्त करतो’ असं सांगून काम न करणं म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
लहान मुलांचे अपघात, तरीही दुर्लक्ष:
या रस्त्यावर आतापर्यंत अनेक लहान मुले अपघातात जखमी झाली आहेत. स्थानिकांनी हे सर्व घडलेले प्रसंग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी आजतागायत रस्त्याची डागडुजीही झाली नाही.
१००% घर कर भरणाऱ्यांची उपेक्षा:
सदर प्रभागातील रहिवासी नियमितपणे १००% घर कर भरतात, तरीही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत हे शासनाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करतं.
“आज अपघात झाला, उद्या जीव गेला तर जबाबदार कोण?”
आज या ठिकाणी पुन्हा एक अपघात झाला आहे. नागरिक आता महापालिकेच्या उदासीनतेला दोषी धरत प्रश्न विचारत आहेत – “उद्या जीवितहानी झाली, तर जबाबदार कोण?”