सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

सूरत – गुजरातची डायमंड सिटी सूरतमध्ये गँगरेपची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी स्थानिक भाजपा नेता आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. एका २३ वर्षीय युवतीला बीचला फिरवण्यासाठी ते कारने घेऊन गेले. सुवाली बीचवर युवतीला गुंगीचे औषध पाजले आणि त्यानंतर हॉटेलवर तरुणीला घेऊन जात तिथे अतिप्रसंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून भाजपा नेते आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. सूरतच्या जहांगीरपूरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सूरतच्या वेड रोड परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय युवतीला रात्री ओळखीच्या युवकाने कारमध्ये घेऊन सुवाली बीचवर नेले. रात्री तिला कारमधून घराजवळ सोडण्यात आली. ही युवकी घरात जाऊन रडत होती. तिला चालताही येत नव्हते. कुटुंबाने मुलीकडे विचारणा केली तेव्हा तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. मुलगी म्हणाली की, आदित्य उपाध्याय आणि गौरव सिंह राजपूत या दोघांसोबत ती सुवाली बीचला गेली होती. तिथे युवकांनी तिला गुंगीचे औषध दिले त्यामुळे तिला काहीच कळाले नाही. सुवाली बीचवरील एका हॉटेलला नेऊन तिच्यावर गँगरेप केला. गँगरेपनंतर या दोघांनी तिला घराजवळ सोडले आणि तिथून निघून गेले.
भाजपाने केले निलंबित मुलीने सांगितलेला प्रकार ऐकून कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी तातडीने जहांगीरपुरा पोलीस स्टेशनला पोहचून तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री आदित्य उपाध्याय आणि गौरव सिंह राजपूत या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींमधील आदित्य उपाध्याय हा सूरत शहर वार्ड नंबर ८ मध्ये महामंत्री पदावर कार्यरत आहे. पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणी आदित्यला अटक करताच भाजपाने तात्काळ त्याची पक्षातून हकालपट्टी केली. गँगरेप करणारा आदित्य आणि गौरव दोघेही मुलीला आधीपासून ओळखत होते. ही मुलगी या दोघांना चांगले ओळखत होती. हे तिघे सोशल मीडियावर एकमेकांशी बोलायचे. त्यातूनच मुलीला त्यांच्यावर भरवसा निर्माण झाला आणि ती त्यांच्यासोबत फिरायला गेली. या दोघांनी मुलगी शुद्धीत नसताना तिच्यावर अतिप्रसंग केला. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.