‘हे असं काम चालणार नाही…’ अजित पवारांकडून वैद्यनाथ मंदिराच्या कंत्राटदाराची खरडपट्टी

Ajit Pawar Beed Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यासाठी पोहोटले. परळीतून पोहोचून तिथूनच त्यांनी या दौऱ्याची सुरुवात केली.
परळीतील विविध विकास कामांचा आढावा घेऊन ते आराखडा बैठक घेणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यक्रम रुपरेषेतून समोर आली. दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्या सोबत मंत्री पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील उपस्थित असून, त्यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमांना हजेरी लावली.
बीडमध्ये दाखल होताच त्यांचं अतिशय दिमाखात स्वागत करण्यात आलं. इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून यांच्यासाठी 101 किलोंचा पुष्पहार आणला गेला होता, तर त्यांच्या आगमनानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी फटाक्यांसह फुलांची उधळणही केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार बीड दौऱ्यावर असतानाच यावेळी धनंजय मुंडेसुद्धा सक्रिय असल्याचं पाहायला मिळाली.
एकिकडे पालकमंत्री आल्यानं बीडमधील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची लगबग सुरू असतानाच दुसरीकडे मात्र अजित पवारांच्या कचाट्यात एक व्यक्ती सापडली आणि मग इथंच पुन्हा पाहायला मिळाले रोखठोक अजित पवार. ते कायमच आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात आणि याचीच प्रचिती पुन्हा एकदा परळीत आली.
परळीत नेमकं काय घडलं?
अजित पवार परळीमध्ये आले असता ते तिथं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणाऱ्या परळी वैद्यनाथ क्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी बैठक घेणार होते. याचसाठी ते मंदिरापाशी पोहोचले आणि तिथं पायऱ्या चढून जाताना तिथलं काम व्यवस्थित नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि लगेचच त्यांनी कंत्राटदाराला फैलावर घेतलं. असं काम माझ्यासोबत बिल्कुल चालणार नाही अशी तंबी त्यांनी कंत्राटदाराला दिली. आपण पुढच्या वेळी जेव्हा इथं येऊ तेव्हा इथं असं काम दिसायला नको अन्यथा यावर कडक कारवाई केली जाईल असा थेट इशारासुद्धा त्यांनी दिला.
अजित पवार कंत्राटदाराला खडसावत असताना तिथं मंत्री पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हेसुद्धा तिथंच उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे अजित पवार यांची काम आणि जबाबदारीप्रति असणारी एकनिष्ठा आणि त्यांचा वक्तशीरपणा यावेळीसुद्धा बीडमध्ये पाहायला मिळाल्यानं त्यांच्यासोबत काम करणारेसुद्धा यावेळी खडबडून जागे झाल्याचं पाहायला मिळालं.