Mumbai Crime: गर्लफ्रेंडच्या मुलीवर तरुणाकडून बलात्कार, आईच्या डोळ्यासमोरच चिमुकलीच्या शरिराचे लचके तोडले

मुंबईमध्ये एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडच्या अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी महिलेसह तिच्या १९ वर्षीय बॉयफ्रेंडला अटक केली. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहे. या घटनेमुळे मुंबई हादरली.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचे १९ वर्षीय तरुणासोबत अनैतिक संबंध होते. ही महिला विवाहित असून तिच्या पतीपासून ती वेगळी झाली आहे. ही महिला गर्भवती असताना तिचा पती तिला सोडून गेला. त्यानंतर या महिलेला मुलगी झाली. ३ वर्षांपूर्वी तिने नवऱ्याला घटस्फोट देखील दिला. ही महिला आपल्या मुलीसोबत आईच्या घरी राहत होती. याचदरम्यान या महिलेचे आरोपी १९ वर्षीय तरुणासोबत शारीरिक संबध निर्माण झाले. दोघे अनेकदा भेटत देखील होते.
१८ मे रोजी रात्री आरोपी तरुणाने महिलेच्या डोळ्यासमोरच तिच्या अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. चिमुकल्या मुलीला प्रचंड वेदना होत होत्या. ती जोरजोरात रडत होती. या त्रासातच चिमुकलीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी महिलेने आपल्या मुलीला मालवणी येथील रुग्णालयात नेले. त्याठिकाणी तिने डॉक्टरांना खोटं सांगितले की, तिची मुलगी अपस्माराने ग्रस्त आहे. पण डॉक्टरांनी चिमुकलीची तपासणी केली असता त्यांना धक्का बसला. मुलीच्या गुप्तांगावर जखमा होत्या. त्यांनी मुलीची तपासणी करून तिला मृत घोषीत केले. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मालवणी पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह तिच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात बलात्कारासह हत्या आणि पोक्सो कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला. या घनटेमुळे मालवणी परिसरात खळबळ उडाली.