अमरसोडा फॅक्टरी परिसरातील बाजाराच्या जागेवर अनधिकृत दुकाने? मनपा आयुक्तांची पाहणी

अमरावती : इतर परिसरातील अमरसोडा फॅक्टरीजवळची जागा अनेक वर्षांपासून साप्ताहिक बाजार भरविण्यासाठी राखीव होती. मात्र, अलीकडे या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने टीनाचे शेड उभारून दुकाने तयार करून ती व्यापाऱ्यांना वितरित करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी ही संपूर्ण प्रक्रिया अनधिकृतरित्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अनधिकृत बांधकामावर संताप
स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, संपूर्ण बांधकाम कोणतीही अधिकृत परवानगी न घेता करण्यात आलं असून, साप्ताहिक बाजाराची जागाच व्यापाऱ्यांना देण्यात आली, ही बाब अन्यायकारक आहे. महानगरपालिकेकडे या संदर्भात लेखी निवेदन सुद्धा सादर करण्यात आलं होतं. यामध्ये इतर विविध नागरी समस्या व मागण्यांचाही समावेश होता.
आयुक्त सचिन कलंत्री यांचा पाहणी दौरा
या तक्रारीची दखल घेत महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्री यांनी बुधवार, 21 मे रोजी स्वतः अमरसोडा परिसराची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना “संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल,” असं आश्वासन दिलं आहे.
कोट्यवधींची वसुलीचा आरोप
नागरिकांनी असा आरोपही केला की, बाजार परवाना विभागाचे अधीक्षक उदय चव्हाण यांनीच व्यापाऱ्यांकडून अनधिकृतपणे कोट्यवधी रुपयांची वसुली केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बांधकाम कोणत्याही नियमानुसार झालेलं नाही आणि व्यावसायिकांकडून पैसे घेऊन जागा दिली गेली.