‘ऑपरेशन सिंदूर लष्कराच्या पराक्रमाला सलाम | काँग्रेसची नागपूरात तिरंगा यात्रा

नागपूर : नागपूर शहरात भारत माता चौक ते इतवारी दरम्यान आज देशभक्तीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. निमित्त होतं भारतीय लष्कराने अलीकडेच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून दाखवलेल्या पराक्रमाचं आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी.
या पार्श्वभूमीवर नागपूर काँग्रेसतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा भारत मातेच्या जयघोषात निघाली आणि नागपूरच्या रस्त्यांवर देशप्रेमाचं वातावरण निर्माण झालं.
हातात तिरंगा, तोंडात घोषणांचा नारा…
कार्यकर्ते आणि नागपूरकर नागरिकांच्या हातात तिरंगा, तोंडात “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणा आणि उरात देशप्रेम… या यात्रेनं संपूर्ण मार्गात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. पोलिसांकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ऑपरेशन सिंदूरच्या वीरांना सलाम
या यात्रेदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी “ऑपरेशन सिंदूर अभिनंदन”, “भारतीय लष्कर जिंदाबाद” अशा घोषणा देत भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “ही यात्रा केवळ राजकीय उपक्रम नसून जवानांच्या पराक्रमाचा सन्मान आहे.”
नेतृत्व आणि उपस्थिती
आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेला सुरुवात झाली.
माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अँड. अभिजीत वंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
लहान मुलांचे पारंपरिक वेशभूषेतील सहभागी, देशभक्तिपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे या यात्रेची खास वैशिष्ट्यं ठरली.
राजीव गांधी यांची आठवण
या तिरंगा यात्रेच्या निमित्तानं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या योगदानाची आठवण करून देण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, राजीव गांधी यांनी भारताच्या आधुनिकतेसाठी जे योगदान दिलं, त्याला विसरता येणार नाही.