निकृष्ट दर्जाच्या उड्डाणपूल कामावर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; अकोल्यात रास्ता रोको आंदोलन

अकोला : अकोल्यातील न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा या परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत आज शिवसेना (ठाकरे गट) कडून तीव्र आंदोलन करण्यात आलं.
या कामात भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या संगनमताने भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत शासन आणि ठेकेदार बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप करत या रस्त्यावर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीसह रास्ता रोको आंदोलन केलं.
पोलीस बंदोबस्त आणि शासकीय आश्वासनानंतर आंदोलन मागे
या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी कामाचा दर्जा तपासून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
शिवसेनेचा इशारा – दर्जा न सुधारल्यास तीव्र आंदोलन
जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी चेतावणी दिली की, “कामात सुधारणा न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करेल.” त्यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवरही निशाणा साधत, “सत्तेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत,” असा आरोप केला.
या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.