परतवाडा- अमरावती मार्गावर थरारक बस अपघात – 80 प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचला

अमरावती : परतवाडा-अमरावती मार्गावर एक धक्कादायक घटना घडली असून एसटी बसने प्रवास करणाऱ्या सुमारे ८० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. भर रस्त्यात चालू असताना बसचं समोरचं चाक अचानक निखळून रस्त्यावर पडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
सदर बस भरधाव वेगाने जात असताना समोरचं चाक अचानक सुटल्यामुळे बस काही अंतर खरपडत गेली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या थरारक प्रसंगाचा अनुभव घेतला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बस थांबवली आणि मोठा अपघात टळला.
या घटनेमुळे एसटीच्या तांत्रिक देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे ठरत आहे.
विशेष म्हणजे, केव ळ १० दिवसांपूर्वीही अमरावती आगारातील एका बसचं चाक निखळल्याची घटना घडली होती. त्यावेळी संबंधित आगार प्रमुखाला निलंबित करण्यात आले होते. तरीदेखील अशा घटना पुन्हा घडत असल्या, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतच्या व्यवस्था ढासळल्याचं स्पष्ट होत आहे.