पुसद: वकिलावर कार चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न; लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी

माझ्या विरोधात केसेस का घेतो, असे म्हणत वकिलाच्या अंगावर कार चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना यवतमाळच्या पुसद येथील तलाव ले-आउटमधील परिसरात घडली. भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ॲड आदित्य माधवराव माने यांच्यावर हा हल्ला झाला आहे. याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी आशिष भानुप्रकाश कदम (४०, रा. तलाव ले-आउट, पुसद), भूषण यशवंत माळोदे (३५, रा. विठाळा वॉर्ड, पुसद) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
अॅड. माने यांनी आरोपी आशिषविरुद्ध अनेक प्रकरणात वकील पत्र घेतले आहे. त्यामुळे आशिष न्यायालयात नेहमी अॅड. माने यांच्याकडे रागाने बघत होता. सोमवारी रात्री अॅड. माने जेवण करून श्वानासह वॉकिंगसाठी निघाले होते. यावेळी आशिषची काळ्या रंगाची कार उभी होती. याच ठिकाणी अॅड. शिवाजी खराटे, शिवराज सर्जेराव पाटील आणि एक अनोळखी व्यक्ती उभा होता. खराटे व पाटील ओळखीचे – असल्याने त्यांनी अॅड. माने यांना आवाज दिला. त्याचवेळी आरोपी आशिषने माने यांना शिवीगाळ सुरू केली.
माझ्याविरुद्ध केसेस घेण्याची तुझी हिम्मत कशी झाली, असे म्हणून आशिष च्या मित्राने कारमध्ये बसून माने यांना जिवानिशी मारण्याच्या उद्देशाने कार अंगावर चढवली. अॅड. माने बॉयनेटवर घासत गेले व पुढे भिंत असल्यामुळे आरोपीने ब्रेक दाबला. त्यानंतर जीवाच्या आकांताने माने कान्व्हेन्टच्या मागच्या बाजूने पळाले. त्या ठिकाणी नाली असल्याने आरोपीने कार थांबवली. आशिषने वाहनातून उतरून लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने माने गंभीर जखमी झाले. अॅड. खराटे व पाटील यांनी माने यांची आरोपीच्या तावडीतून सुटका करीत शहर पोलिस ठाणे गाठले. तेथून माने यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या अॅड. माने यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर कलम १०९ (१), ११८ (१), २९६, ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून ताब्यात घेतले आहे.