पूर्णा नगर ते निरूळ गंगामाई रस्त्याची दयनिय अवस्था

भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर ते निरूळ गंगामाई रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. सध्या या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्ता, असंख्य खड्डे आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी परिस्थितीमुळे शाळकरी मुलं, वृद्ध आणि रोज प्रवास करणारे कामगार यांचे हाल सुरूच आहेत.
एक महिन्यापूर्वीच करण्यात आलेली डागडूजी अपूर्ण
सदर रस्त्याचे डागडूजीकरण सुमारे महिनाभरापूर्वी करण्यात आले होते. मात्र ही डागडूजी फक्त कागदावरच झाली की काय, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. काही खड्डे बुजवले असले तरी बहुसंख्य खड्डे तसेच आहेत. पावसाळ्याच्या तोंडावरही हा रस्ता तसाच राहिला तर परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागरिकांची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या रस्त्याकडे तत्काळ लक्ष देऊन योग्य दर्जाचा रस्ता तयार करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याच्या निकृष्ट डागडूजीमुळे वाहनांची नासधूस वाढली असून अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक प्रशासनाचा उदासीनपणा?
रोजंदारीवर प्रवास करणाऱ्यांसह विद्यार्थ्यांचेही हाल सुरू आहेत. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचा या प्रश्नाकडे असलेला उदासीनपणा नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे.