माहूर अंगणवाडी सेविका निवडीत वाद; औद्योगिक न्यायालयाकडून स्थगनादेश

श्री क्षेत्र माहूर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी नुकतीच भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रिये अंतर्गत सतिगुडा येथील ममता विष्णू कांबळे यांना अंतिम यादीत दुसऱ्या क्रमांकावर टाकल्याने सुषमा सुरेश मेश्राम यांची त्या पदासाठी निवड केली गेली. त्यावर ममता कांबळे यांनी आक्षेप नोंदवून औद्योगिक न्यायालय जालना यांचेकडे न्याय मागितला असता सदर न्यायालयाने संबंधित निवडीवर स्थगनादेश दिल्याने तिथली निवड खोळंबली आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत माहूर तालुक्यात 40 अंगणवाडी सेविका या पदासाठी 449 व 50 मदतनीस या पदासाठी 307 असे एकूण 756 अर्ज माहूर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार विहित कालावधीत पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. परंतु सतिगुडा येथील ममता कांबळे यांनी सुषमा मेश्राम यांना दिलेल्या पदनियुक्तीवर आक्षेप घेऊन तसा अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय माहूर यांना दिला. प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी पी. सी. भिसे (वर्ग 3)यांनी आम्ही दिलेली नियुक्ती ही नियमानुसार व निकषानुसार केली असल्याचे सांगून अर्ज निकाली काढला. ही बाब उमेदवार कांबळे यांना मान्य नसल्याने त्यांनी नियुक्ती मिळालेल्या उमेदवार सुषमा मेश्राम ह्या विवाहित असून त्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी असल्याचा मुद्दा पुढे करून जालना येथील औद्योगिक न्यायालयात न्याय मागितला. त्यावर त्या न्यायालयाने स्थगनादेश पारित केला आहे.निवड प्रक्रियेत बालविकास प्रकल्प अधिकारी शिवगंगा पवार, विस्तार अधिकारी संजय मेडपेलीवार व पर्यवेक्षिका सी. एन. पाटील यांनी तपासनिक अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले अशी माहिती कनिष्ठ सहाय्यक सचिन ढवळे यांनी दिली.
वास्तव्य, गुण व ज्येष्ठता या बाबीचे निकष पडताळूनच पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.तसेच एका ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा दोन पदासाठी एकाच महिलेने भरलेल्या अर्जामुळे त्या महिलेला नियुक्ती मिळाली, त्यांचा नकार घेऊन तिथली एक जागा भरली जाईल,सतिगुडा येथील उमेदवार मेश्राम यांना तहसीलदार माहूर यांच्या रहिवासी प्रमाण पत्रावरून नियुक्ती देण्यात आली अशी प्रतिक्रिया प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी पी. सी. भिसे यांनी दिली.