‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ अभियानात जेवड शाळेचा तालुकास्तरीय विजय!
अमरावती – ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड यांनी अमरावती तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२४ दरम्यान राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे यशस्वी फलित म्हणून आज जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत पंचायत समिती अमरावती तर्फे पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
हा सन्मानप्रद कार्यक्रम जि.प. माध्यमिक कन्या हायस्कूल, अमरावती येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश मेश्राम, शिक्षणाधिकारी, मनपा अमरावती होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय वानखडे, गटशिक्षणाधिकारी पं.स. अमरावती, अजित पाटील, विस्तार अधिकारी आणि संदीप बोडखे साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीला डांगे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल शाळेला ३ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
मान्यवरांचे अभिनंदन आणि प्रेरणादायी शुभेच्छा
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी जेवड शाळेच्या यशाचे कौतुक करत पुढील जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.