यवतमाळ: जळीत हत्याकांडाचा उलगडा; मुख्याध्यापिका पत्नीने केली पतीची हत्या

यवतमाळ : यवतमाळ शहरालगत लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात एका तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून जाळण्याची धक्कादायक घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाने सखोल तपास करत या प्रकरणाचा उलगडा केला असून, मृतकाची ओळख शंतनु अरविंद देशमुख (वय 32, रा. सुयोगनगर) अशी पटवली आहे. या हत्याकांडाची मुख्य आरोपी मृतकाची पत्नी आणि मुख्याध्यापिका निधी शंतनु देशमुख असल्याचे समोर आले आहे. तसेच, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
शंतनु आणि निधी हे दोघे यवतमाळ येथील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अनुक्रमे शिक्षक आणि मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते. त्यांचा प्रेमविवाह झाला होता, परंतु गेल्या काही काळापासून त्यांच्यात सतत वाद होत होते. या वादातूनच निधीने शंतनु याची हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह जंगलात नेऊन ज्वलनशील पदार्थ ओतून जाळला. या कृत्यात तिला तीन अल्पवयीन मुलांनी मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिस कारवाई:
लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान मृतकाची ओळख पटवून मुख्य आरोपी निधी शंतनु देशमुख याला अटक करण्यात आली. तसेच, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहभागी असलेल्या तीन विधी संघर्षातील बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या धक्कादायक हत्याकांडाने यवतमाळ शहरात खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे कृत्य घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.