राजापेठ विभागातील महावितरणचा ढिसाळ कारभार

अमरावती – महावितरणच्या राजापेठ विभाग क्र. 1 अंतर्गत परिसरात विद्युत सुरक्षेच्या नियमांना ठेंगा दाखवत उघड्या डीपी, लोंबकळणाऱ्या वायर्स आणि अपूर्ण देखभाल यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. येत्या पावसाळ्यात या ढिसाळ व्यवस्थेमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
थोडा पाऊस, आणि तासन्तास वीज गायब
नुकत्याच झालेल्या अल्प पावसात देखील 2 ते 3 तास वीज बंद राहत आहे. यामुळे विद्यार्थी, गृहिणी, लहान मुले, व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्याने दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत आहेत.
मान्सून मेंटेनन्सचा फोलपणा उजेडात
महावितरण विभागाने मान्सूनपूर्व देखभाल केली असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कुठेही सुधारणा दिसून येत नाही. उघड्या डीपींना सुरक्षाकवच नाही, विद्युत तारा झाडांमध्ये अडकलेल्या आहेत, काही ठिकाणी वायर रस्त्यावर पोहोचलेल्या आहेत.
अधिकारी गप्प – नागरिक संतप्त
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अपघात झाल्यावरच कुठलीही कारवाई केली जाते, तोपर्यंत “अपेक्षा करा आणि सहन करा” हीच भूमिका असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जनतेची मागणी – तत्काळ उपाययोजना करा अन्यथा आंदोलन अटळ
नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, जर लवकरात लवकर संपूर्ण राजापेठ विभागात विद्युत यंत्रणेची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली नाही, तर महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.