शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अमरावतीत काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा
अमरावती – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहरात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शेकडो ट्रॅक्टर आणि शेतकरी बांधवांसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
नेहरू मैदान, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची विशेष उपस्थिती होती. तर काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी घोषणांच्या माध्यमातून खुल्या ट्रॅक्टरवरून शेतकऱ्यांच्या भावना बुलंद केल्या.
“तिरंगा हमारे शान है, किसान हमारी जान है, हिंदुस्तान हम है” अशा जोरदार घोषणा देत शेतकरी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या मोर्चात करण्यात आल्या.
या मोर्चात ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला काँग्रेस कार्यकर्त्या, तरुण कार्यकर्ते तसेच जिल्हा व तालुकास्तरीय काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चा शांततेत पार पडला असून, काँग्रेसने सरकारला इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य न केल्यास लढा अधिक तीव्र केला जाईल.