अकोल्यातील गुडवाले प्लॉट परिसर जलमय! सांडपाण्याने रस्ते भरले – नागरिक संतप्त

अकोला : अकोला शहरातील प्रभा क्रमांक 18 येथील गुडवाले प्लॉट, मोहम्मदिया मस्जिदसमोरील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यांच्या अभावामुळे नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी जलनिकासीची कोणतीही व्यवस्था नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असून परिसरात अस्वच्छतेचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही समस्या नव्याने निर्माण झालेली नसून गेल्या अनेक वर्षांपासून ती तशीच आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. रस्ते जलमग्न होतात, ज्यामुळे पादचाऱ्यांना तसेच दुचाकीधारकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. लहान मुलं, वृद्ध आणि महिलांना याचा फार मोठा त्रास होत आहे.
नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्यापही ठोस उपाययोजना झालेली नाही. अपूर्ण नाल्यांमुळे सांडपाणी सरळ रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे या भागात रोगराई फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारचा ‘स्वच्छ भारत अभियान’ एकीकडे राबवला जात असला तरी या परिसरातील विदारक स्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देत आहे.
स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि रहिवाशांनी एकमुखाने मागणी केली आहे की –
- त्वरित जलनिकासी व्यवस्था सुधारण्यात यावी
- पूर्णपणे पक्क्या नाल्यांचे बांधकाम करावे
- रस्त्याची डागडुजी करून नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करावा
या मागण्यांकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सध्या तरी येथील नागरिक दुर्गंधी, कीटक आणि अस्वच्छतेच्या कोंडवाड्यात अडकलेले आहेत, आणि यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे.