अकोल्यात गटारीचं पाणी घरात! अब्दुल कलाम चौक परिसर जलमय – नागरिक संतप्त

अकोला : अकोला शहरातील अकोट फैल परिसरातील अब्दुल कलाम चौक येथील गौसिया मशिदीच्या गल्लीतील नागरिक सध्या गंभीर संकटाला सामोरे जात आहेत. आज दिनांक 21 मे रोजी संध्याकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण गल्लीतील पावसाचे आणि गटारीचे पाणी थेट घरांमध्ये घुसले. त्यामुळे परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागासाठी यापूर्वीही स्थानिकांनी नाले व सफाई संदर्भात महापालिकेकडे वारंवार मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजची ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे. गटारीतील घाण आणि पावसाचे साचलेले पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसल्यामुळे आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया:
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गटारातून येणाऱ्या पाण्यामुळे केवळ दुर्गंधीच नाही, तर साथीच्या रोगांचा धोका प्रचंड वाढला आहे. लहान मुले, महिला आणि वृद्ध यांना या अस्वच्छ पाण्यामुळे त्रास होत असून काही घरांमध्ये अन्नधान्यही खराब झाल्याची माहिती समोर आली आहे.
राहण्याचा प्रश्न उभा:
पाण्यामुळे अनेक घरांमध्ये दरवाज्यापर्यंत पाणी पोहोचले असून काही नागरिकांनी घर सोडून दुसरीकडे आश्रय घेतल्याचेही समजते. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने नाले सफाई व जलनिकासी व्यवस्था सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने जागे व्हावे:
या भागातील परिस्थिती पाहता, जर तात्काळ उपाययोजना न केल्यास आरोग्यसंकट उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी इशारा दिला आहे की, यापुढे याकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.