आपत्ती उदभवल्यास सर्व यंत्रणांनी समन्वय साधून उपाययोजना करावी मान्सुनकाळात आपत्ती समस्या उदभवणार नाही याची दक्षता घ्यावी – आ. सुलभाताई खोडके
अमरावती : हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे तसेच जीवित व वित्त हानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे; तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी. आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी आज दिले.
मान्सूनकाळात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून व सतर्क राहून काम करावे, अशा सूचना आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी दिल्या.
मान्सून पूर्व तयारी २०२५ आढावा बैठक डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महानगरपालिका, अमरावती येथे झाली. बैठकीला आमदार संजय खोडके, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, महावितरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री शिंदे साहेब, मजीप्राचे अधिक्षक अभियंता श्री साळुंखे साहेब, साबांवि कार्यकारी अभियंता श्री गिरी साहेब, यश खोडके, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार सौ.सुलभाताई खोडके म्हणाल्या, हवामान विभागाने वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तविला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून नियोजन करावे. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. विज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असावी. बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी, असे सांगून आमदार सौ.सुलभाताई खोडके म्हणाल्या, पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तत्परतेने मदत पोहोचण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतर्क रहावे, आपत्ती कालावधीत सतर्क करण्याबाबत माहिती पोहचवा, अशा सूचना आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी यंत्रणेला दिल्या.
पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्यावी. महानगरपालिका क्षेत्रातील नाल्यांची सफाई कामे तातडीने पूर्ण करावी. बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवा. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही मनपा प्रशासनाने घ्याव्यात. शहरात संभाव्य पूरबाधित तसेच बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट आदी विविध साधने, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, नियंत्रण कक्ष, नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात मनपा प्रशासनाने पूर्वतयारी करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घेण्याचे निर्देश आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी दिल्या.
यावेळी आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी गाळ, मनपा क्षेत्र, अतिधोकादायक कारखाने, बोट, शोध व बचाव साहित्य, फायर सूट, पोर्टेबल इन्फ्लॅटेबल एलईडी लाईट सिस्टीम, रोप आणि रेस्क्यू किट, जेसीबींची संख्या, होर्डिंग्ज बाबत आढावा घेतला. त्या म्हणाल्या, शहरातील विविध भागात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असते, त्यामुळे पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. जिथे तांत्रिक यंत्रणा पोहचू शकत नाही तिथे मनुष्यबळाद्वारे नाले साफ सफाई करावी. नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. भुयारी गटार संदर्भात मजीप्रा आणि महानगरपालिका यांची समन्वय समिती निर्माण करण्याचे निर्देश आमदारांनी दिल्या. अमरावती शहरात प्रत्येकाने रेनवॉटर हार्वेस्टिंग बाबत लोक चळवळ निर्माण होणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. सहाय्यक संचालक नगर रचना विभागाने बांधकाम परवानगी नाहरकत प्रमाणपत्र रेनवॉटर हार्वेस्टींग झाल्यावरच देण्यात यावे. महावितरण मार्फत शहरातील झाडांच्या फांद्या तोडल्या जात आहे त्या त्वरीत उचलणे अपेक्षित आहे. मनपाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी. अमरावती शहर हरीत व सुंदर होण्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे दुभाजक. सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका यांनी समन्वय साधून अमरावती शहरातील प्रत्येक दुभाजक सुव्यवस्थित करुन अमरावती शहराचा सौंदर्यीकरणात भर घालावी.
अमरावती महानगरपालिकेच्या शाळेंचा खालवलेला दर्जा सुधारण्यासाठी मागील काही वर्षापासून सातत्याने प्रयत्न करुन आज महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचे सुखद चित्र दिसत आहे. शाळेत डिजीटल बोर्ड देण्यात आले असून येणा-या काळात संपुर्ण शाळेत सीसीटीव्ही लावण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाची निर्मिती येणा-या काळात करण्यात येईल. महानगरपालिकेच्या ५ ते ८ वर्ग असणा-या शाळेंमध्ये ग्रंथालय सुरु करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी देतांना घोषणा केली की, यासाठी लागणारे सर्व पुस्तके आमच्यातर्फे उपलब्ध करुन दिल्या जाईल. सर्व मुख्याध्यापकांशी संवाद साधतांना विद्यार्थ्याला गुणवत्तापुर्वक व दर्जेदार शिक्षण देवून त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल करावा.
बांधकाम विभागाने धोकादायक पुलांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करावी. शहरातील विविध भागात मान्सून कालावधीपर्यंत जेसीबी, पोकलेन, डंपरची व्यवस्था कायमस्वरुपी करावी. आरोग्य विभागाने पावसाळ्यात साथीचे रोगांचा प्रसार होवू नये म्हणून उपाययोजना करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी महानगरपालिकेने केलेल्या मान्सून पूर्व तयारी व आपत्ती निवारण याबाबतची माहिती दिली.