आ. संजय खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भ समन्वयक पदावर नियुक्ती

अमरावती : अनुभवी राजकारणी आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या आ. संजय खोडके यांची विदर्भ समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन या नव्या जबाबदारीचा अधिकृत पदभार सोपवला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी संजय खोडके यांच्यावर मोठा विश्वास दाखवत विदर्भातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समन्वय सोपवला आहे. या नियुक्तीनुसार ते अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमधील पक्षाच्या कामकाजावर देखरेख आणि समन्वयाचे कार्य पाहणार आहेत.
आ. संजय खोडके यांना राजकारणाचा अनेक दशकांचा अनुभव असून, त्यांनी यापूर्वी अनेक पदांवर प्रभावीपणे काम केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले खोडके हे पक्ष संघटनात्मक बांधणी आणि गट-तट बाजूला ठेवून एकत्रित काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात.
पक्ष संघटनासाठी नवी उर्जा
पक्षाच्या विदर्भातील संघटनात्मक मजबुतीसाठी ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, आगामी निवडणुकांसाठी ही नियोजनपूर्व टाकलेली पावले असल्याचे जाणकारांचे मत आहे. आ. संजय खोडके यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.